Wednesday 22 June 2016

जाणिव

जाणिवांची चाड जर शिलकीत आहे
पाहूनी घे आरशातून तू स्वतःला
खंतावल्या नजरा तुझ्या का आणि     
आरशातून काय दिसले आरशाला  
पाहुनी घे कृष्णवर्णी देह माझा    
मी घृणेच्या काजळाने रंगलेला                                           
का नभाच्या मी दिलाचा होत आलो
राहूनी आश्चर्य झाले कातळाला                                      
ती बरसली ज्या नदाच्या पृष्ठभागी      
खोल तो डोहांत होता संपलेला
-अनुज

Saturday 19 March 2016

चंद्रगौर

डोळ्यांत तुझ्या काळीभोर
नभात सजते चंद्रगौर
डोळ्यांत तुझ्या चांदणसय
आणि खळं ओंजळभर

चांदण्यात भिजलेलं
डोळ्यांत तुझ्या ओलं घर
कौलांवरुन ओघळणारी
लावण्याची
दुधाळ सर

डोळ्यांत तुझ्या गर्द राई
डोळे तुझे रानभूल
डोळ्यांत तुझ्या जाई जुई
डोळे कळी डोळे फूल

डोळ्यांत तुझ्या स्वप्नं काही
चंद्राळलेली पाऊलवाट
खळखळणाऱ्या नादिकाठी
डोळ्यांत तुझ्या स्तब्ध घाट

डोळ्यांत तुझ्या काजळभरले
नीळाईचे किती रंग
डोळ्यांत तुझ्या गंधकेशरी
प्राजक्ताचे शारदसंग

डोळ्यांत तुझ्या घट्ट मिठी
डोळे तुझे किती भास
कधीकाळी पाणावलेले
गाभूळलेले हळवे श्वास

तुझे डोळे निळं आभाळ
नक्षत्रांनी गोंदलेलं
डोळ्यांत तुझ्या निःशब्द
पापण्यांनी कोंदलेलं 

आठवांच्या अंगणात माझ्या
डोळ्यांमधला लपंडाव
जिथे तिथे अंगणभर
भरुन राहतो तुझा भाव

डोळे तुझे हिरवं गूढ़
पुष्कर आणि माणिकसर
डोळे तुझे गभीर भैरव
डोळे तुझे खिन्न स्वर

मला शोधत शब्दांमध्ये
मी तुझ्या पापण्यांवर
हरवलेली कविता माझी
डोळे तुझे तिचं घर

Thursday 3 September 2015

कैफियत

मज संपतात जेथे आसवे न्या कुणी
मी संपलो तरीही आसवे मज द्या कुणी

अपराध काय माझा मी झेलतो सरींना
समजून थेंब माझी आसवेही घ्या कुणी

डोळ्यांस बिंब माझ्या माझेच का रुचेना
नजरांस आज माझ्या नजरांतूनी पोळा कुणी

अस्पृश्य मीच वाटे हातांस काय माझ्या?
श्वासांस अस्तरे ही हलके अशी उसवा कुणी

कसल्या उरी दिल्या रे रक्ताळ वेदना तू
त्या वेदना अणि ते काळीजही नेता कुणी??

हो दीन आज आहे दारी तुझ्या जरी मी
हे दान आसवांचे सांगेल का मजला कुणी?

Monday 27 July 2015

सीमोल्लंघन

जन्मभराचा प्रवास संपून
क्षणबिंदूंची ओंजळ का तू
फिरण्यापूर्वी सांग फकीरा
सिमोल्लंघन केलंस का तू?

जगण्याच्या ओघात नव्याने
मरणाला ओळखले का तू?
गंधधुक्यातून सांग फकीरा
सीमोल्लंघन केलंस का तू?

दिसली का तुज वादळचीन्हे
शांततेच्या स्वरात काही?
क्षितिजाच्याही पल्याड आता
सीमोल्लंघन केलंस का तू?

सापडले का तुला तुझे जे
नभी प्रकाशाइतुके होते
दिसले तुजला काय फकीरा?
सीमोल्लंघन केलंस का तू?

अनासक्त निर्मोही असुनि
अव्यक्ताचा साधक का तू?
स्वतःत पाहून सांग फकीरा
सीमोल्लंघन केलंस का तू??

मृत्युही तू भिके घेतला
जन्माचा मग दाता का तू
आता सगळे लुटून गेले
सीमोल्लंघन केलंस का तू?

Friday 26 June 2015

विरहिणी

आज अचानक पाऊस झरला
श्वासांच्या थरथरल्या ज्योती
आज अचानक पाऊस झरला
गंधांतून विरघळली माती

         आज अचानक पाऊस झरला
         नभ कोंदटले जरी उराशी
         मेघांच्या सौधात दामिनी
          नभांस जाळत उरे जराशी

आज अचानक झरली राधा
आज अचानक भिजले गोकुळ
राहून गेला कान्हा भिजता
राहून गेले त्याचे राउळ

      भिजल्या त्या राधेच्या नयनी
      अजुन ओला काजळ श्रावण
      यमुनेच्या त्या पैलतीरावर
      गहिवरले कान्हयाचे पूजन

Saturday 23 May 2015

पत्रं फुलांची

अपूर्ण तरीही आहे कविता

तुला फुलांची पत्रं निनावी
तुला फुलांचा सुवास गेला
अखंड त्यांचा प्रवास आहे
तरी न त्यांचा हिशेब केला

वाऱ्याशी गुंतून पडलेली
पाण्याशी क्षणतरंग झाली
ओठांवरची ओळ तरीही
डोळ्यांतून ती अबोल ओली

वाहत स्वैर चहु दिशांना
अनंत त्यांचा प्रवास नुरला
सुकलेल्या डोळ्यांतून फसवा
अस्तित्वाचा प्रश्नही उरला

तुला फुलांची पत्रं निनावी
चुकलेल्या वाटांवर गेली
तुला फुलांचे हिरवे काकण
तुला फुलांची कविता ओली

ओळख उरली काळोखाशी
अभंग माझा विहंग फुटला
उगाच फड़फड पाकोळीची
प्रतिबिंबांचा प्रवास उरला

Friday 24 April 2015

माझी अपूर्ण कविता

सर येई सर अवचित जाई
माझी अपूर्ण कविता
रित्या ओंजळी रीती तुझीही
अपूर्ण माझी कविता

त्या उरल्या शब्दांपुरती,
उरल्या त्या भासांपुरती
धृवपदावर संपून जाई
माझी अपूर्ण कविता

हातांमधल्या हातांसाठी,
कधी कधी सोडवणाऱ्याची
मला ओंजळी भरणारी ही
माझी अपूर्ण कविता

उगाच उरते माझ्यासाठी
सुकलेल्या पानांची ती सर
सहज हसावे स्वतःस नंतर
भकास शब्दांची अन् ओसर

पुन्हा बघावी स्वप्नं कोवळी
इन्द्रधनु अन् बहर वसंती
काट्यांचेही करून लेणे
हसणारा वैशाख वसंती

लाचार खुळी, पाउलवेणी
अखंड चालत माझी कविता
अनंत आशा धरुन उरातून
अखंड स्फुन्दत माझी कविता

मरणानंतर ज्याची त्याला
अपूर्ण तरीही त्याची कविता
शेवटच्या वळणावर माझ्या
शेवटची माझी ही कविता