Monday, 2 March 2015

सायली

सांग सये सांग तुझ्या डोळ्यांत दिसतं काय गं?
सांग सये सांग तुझ्या ओठांत हसतं काय गं?

सांग सये मुल तुझ्यात इतकं अल्लड कसं काय?
सांग सये मन कसं दुधावरची स्निग्ध साय?

सांग सये प्रेम तुझं इतकं कसं निखळ गं?
तुझं माझं नातं हळवं इतकं वेल्हाळ कसं काय?

खरं सांग फुल कुठलं पाखरु होऊन घेऊन येतेस
सुखात दुखाःत सहज हसत
रंगीत माझी सावली होतेस

कळी होतेस ओंजळीत कधी
वेलींवरची पालवी होतेस
अलगद माझ्या डोळ्यांना
बिलगुन माझी नीज होतेस

पाऊल पाऊल नाजुक टाकत
भल्या पहाटे पैंजण होतेस
चंद्रवेड्या चांदणरात्री
माझ्यापुरतं अंगण होतेस

सोनसळी संध्याकाळी
माझी सांजवात तू
रानांमधून हळूच किलबिल
माझ्यासाठी गात तू

पावसामधून चिंब ओलं
कंच हिरवं रान तू
आयुष्यातल्या गाण्यात माझ्या
सगळ्यांत सुंदर तान तू

स्वप्नात माझ्या तुझ्यासारखीच
तूच खरं! सावली काय
स्वप्नं माझं तुझ्याइतकंच
तुझ्यासारखं सुंदर काय?

डोळ्यांत तुझं पहिलं हसू
आणि श्रावणसर गं
तुझी मिठी निघता निघता
माझं इवलं घर गं

आठवशील तू कधी जेव्हा
हसणं तुझं पुन्हा बघेन
सगळं हरवून तुझ्याजवळ
दोन क्षण पुन्हा जगेन

No comments:

Post a Comment