Thursday, 3 September 2015

कैफियत

मज संपतात जेथे आसवे न्या कुणी
मी संपलो तरीही आसवे मज द्या कुणी

अपराध काय माझा मी झेलतो सरींना
समजून थेंब माझी आसवेही घ्या कुणी

डोळ्यांस बिंब माझ्या माझेच का रुचेना
नजरांस आज माझ्या नजरांतूनी पोळा कुणी

अस्पृश्य मीच वाटे हातांस काय माझ्या?
श्वासांस अस्तरे ही हलके अशी उसवा कुणी

कसल्या उरी दिल्या रे रक्ताळ वेदना तू
त्या वेदना अणि ते काळीजही नेता कुणी??

हो दीन आज आहे दारी तुझ्या जरी मी
हे दान आसवांचे सांगेल का मजला कुणी?

Monday, 27 July 2015

सीमोल्लंघन

जन्मभराचा प्रवास संपून
क्षणबिंदूंची ओंजळ का तू
फिरण्यापूर्वी सांग फकीरा
सिमोल्लंघन केलंस का तू?

जगण्याच्या ओघात नव्याने
मरणाला ओळखले का तू?
गंधधुक्यातून सांग फकीरा
सीमोल्लंघन केलंस का तू?

दिसली का तुज वादळचीन्हे
शांततेच्या स्वरात काही?
क्षितिजाच्याही पल्याड आता
सीमोल्लंघन केलंस का तू?

सापडले का तुला तुझे जे
नभी प्रकाशाइतुके होते
दिसले तुजला काय फकीरा?
सीमोल्लंघन केलंस का तू?

अनासक्त निर्मोही असुनि
अव्यक्ताचा साधक का तू?
स्वतःत पाहून सांग फकीरा
सीमोल्लंघन केलंस का तू??

मृत्युही तू भिके घेतला
जन्माचा मग दाता का तू
आता सगळे लुटून गेले
सीमोल्लंघन केलंस का तू?

Friday, 26 June 2015

विरहिणी

आज अचानक पाऊस झरला
श्वासांच्या थरथरल्या ज्योती
आज अचानक पाऊस झरला
गंधांतून विरघळली माती

         आज अचानक पाऊस झरला
         नभ कोंदटले जरी उराशी
         मेघांच्या सौधात दामिनी
          नभांस जाळत उरे जराशी

आज अचानक झरली राधा
आज अचानक भिजले गोकुळ
राहून गेला कान्हा भिजता
राहून गेले त्याचे राउळ

      भिजल्या त्या राधेच्या नयनी
      अजुन ओला काजळ श्रावण
      यमुनेच्या त्या पैलतीरावर
      गहिवरले कान्हयाचे पूजन

Saturday, 23 May 2015

पत्रं फुलांची

अपूर्ण तरीही आहे कविता

तुला फुलांची पत्रं निनावी
तुला फुलांचा सुवास गेला
अखंड त्यांचा प्रवास आहे
तरी न त्यांचा हिशेब केला

वाऱ्याशी गुंतून पडलेली
पाण्याशी क्षणतरंग झाली
ओठांवरची ओळ तरीही
डोळ्यांतून ती अबोल ओली

वाहत स्वैर चहु दिशांना
अनंत त्यांचा प्रवास नुरला
सुकलेल्या डोळ्यांतून फसवा
अस्तित्वाचा प्रश्नही उरला

तुला फुलांची पत्रं निनावी
चुकलेल्या वाटांवर गेली
तुला फुलांचे हिरवे काकण
तुला फुलांची कविता ओली

ओळख उरली काळोखाशी
अभंग माझा विहंग फुटला
उगाच फड़फड पाकोळीची
प्रतिबिंबांचा प्रवास उरला

Friday, 24 April 2015

माझी अपूर्ण कविता

सर येई सर अवचित जाई
माझी अपूर्ण कविता
रित्या ओंजळी रीती तुझीही
अपूर्ण माझी कविता

त्या उरल्या शब्दांपुरती,
उरल्या त्या भासांपुरती
धृवपदावर संपून जाई
माझी अपूर्ण कविता

हातांमधल्या हातांसाठी,
कधी कधी सोडवणाऱ्याची
मला ओंजळी भरणारी ही
माझी अपूर्ण कविता

उगाच उरते माझ्यासाठी
सुकलेल्या पानांची ती सर
सहज हसावे स्वतःस नंतर
भकास शब्दांची अन् ओसर

पुन्हा बघावी स्वप्नं कोवळी
इन्द्रधनु अन् बहर वसंती
काट्यांचेही करून लेणे
हसणारा वैशाख वसंती

लाचार खुळी, पाउलवेणी
अखंड चालत माझी कविता
अनंत आशा धरुन उरातून
अखंड स्फुन्दत माझी कविता

मरणानंतर ज्याची त्याला
अपूर्ण तरीही त्याची कविता
शेवटच्या वळणावर माझ्या
शेवटची माझी ही कविता

Tuesday, 21 April 2015

कातरवेळ

स्वर इतुके शांत झाले शब्दांचा दर्प निमाला          
त्या भयाण कातरवेळी अबोलण्यास अर्थही आला

जगण्याचे कारण तुटले जन्माची फुटकी माळा
मृत्युही निष्ठुर होता उंबऱ्यातून हसलेला
                                 
त्या विरक्त आशा उरल्या क्रंदनांत मिसळून गेल्या
अश्रुंच्या कितीक भेटी पाठवून मी थकलेला

पाऊल पडेना पुढचे वाटांचा छंद जडेना
सवयीच्या वाटांवर मी पत्त्यापुरता असलेला

मी निपचित प्रश्न उद्याचा श्वासांसह संपवलेला
प्रश्नांच्या पल्याड उरलो, चेहरा तुझाच दिसलेला

तू हसता हसता माझ्या पुसल्यास खुणा पायांनी
संवाद एकटा होता माझा तुझ्यात नसलेला

Wednesday, 15 April 2015

तुझ्या गावची वाट

या झाडांच्या पल्याड
तुझ्या गावची वाट जाते

ओली पुसट सांज होते
तिथेच...
तुझ्या गावची वाट जाते

रेंगाळतात पावलं, पावलं शोधत
शोधत शोधत संपते वाट
तुझं गाव तरीही पुढे
उरुन राहते उगाच वाट

तुझ्या गावची वाट जाते

अनोळखी वाटा, वळणं
डोळ्यांतल्या, रस्त्यांच्या
बेवारस कडा
सहज वाटांशी ओळख होते

तुझ्या गावची वाट जाते

आकाश पांघरतं
क्षितिजाची विरुन गेलेली झालर
वाटेतच नीज
विसावते

तुझ्या गावची वाट जाते

तुझ्या शुष्क गावात
कसं ग जगतात
आठवणींच्या नाजुक वेली??
माझी सर त्यांची होते

तुझ्या गावची वाट जाते

Thursday, 2 April 2015

गौतम

रणवाद्यांचा भर ओसरला
षड्ज उगाचच विरुन गेला

     वटवृक्षाच्या छायेखाली

     जरा उमगला विरुन गेला

मौनात कळला अधिक उणा

पुन्हा विसरला विरुन गेला

      जपलेला जो माणूस त्याने

      जरा हरवला उरुन गेला

अगण्य थडगी माणुसकीची

तशातही तो स्मशान झाला
     
     तमातही आसवे तयाची
     चैतन्याच्या प्रकाशमाळा

Friday, 20 March 2015

तुझी आठवण-२

चुकलेल्या वाटांवर पावलांचे ठसे जेव्हा दिसतील

तेव्हा
तुझी आठवण येईल

आभाळ भरेल.... कोसळेल...
थेंबानी त्या पाउलखुणाही पुसट होतील

आता तुझी आठवण येईल

भरलेल्या आभाळाखाली माडांच्या धूसर,
भयाण सावल्या.....
आणि वाऱ्याची संथ कुजबूज
बाकी सगळ शांत होईल

तेव्हा तुझी आठवण येईल

अर्धी वाट चाललीस
आता चाललेली एकटी वाट पुन्हा चालत हरुन जाईल

तेव्हा तुझी आठवण येईल

तुला शोधणाऱ्या माझ्या डोळ्यांसारखे ते पक्षी
उगाच आभाळभर फिरत राहतील

आता तुझी आठवण येईल
पुन्हा मन भरून येईल
आणि.......
तुझी आठवण येईल

Tuesday, 17 March 2015

तिची कविता- १

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये
तुझ्या हसण्याचीही सावली मी अजुन जपलीये

थोडे थोडे शब्द तुझे जणू भरलं आभाळ
एकच तेवढी बेभान सर मी उरात जपलीये

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये...

एकटं एकटं माझं चालणं एकटं केव्हाचं संपलय
मझ्यासोबत तुझं चालणं मी इतकं जपलंय

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये...

खुप जपलंय मी उराशी तुझ्या आठवांचं अंगण
त्यावर पैंजणांचा सडा आणि रंगांचे सर

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये...

एक वेदनांची कडा माझ्या हसण्याला जणू
माझ्या डोळ्यांचही काही कुठे कुठेसं चुकलंय

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये...

माझ्या सावळया देहात फक्त स्पर्श तुझा उरे
तुझं भिजलेलं गोकुळ मी हसतंच सोडलंय

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये...

उगाच माझे शब्दं श्वास नुरल्यासारखे
त्याचं तेवढं शल्य या कवितेत लपलंय

तुझ्या डोळ्यांमधली बाहुली मी अजुन जपलीये
तुझ्या हसण्याचीही सावली मी अजुन जपलीये

Monday, 2 March 2015

सायली

सांग सये सांग तुझ्या डोळ्यांत दिसतं काय गं?
सांग सये सांग तुझ्या ओठांत हसतं काय गं?

सांग सये मुल तुझ्यात इतकं अल्लड कसं काय?
सांग सये मन कसं दुधावरची स्निग्ध साय?

सांग सये प्रेम तुझं इतकं कसं निखळ गं?
तुझं माझं नातं हळवं इतकं वेल्हाळ कसं काय?

खरं सांग फुल कुठलं पाखरु होऊन घेऊन येतेस
सुखात दुखाःत सहज हसत
रंगीत माझी सावली होतेस

कळी होतेस ओंजळीत कधी
वेलींवरची पालवी होतेस
अलगद माझ्या डोळ्यांना
बिलगुन माझी नीज होतेस

पाऊल पाऊल नाजुक टाकत
भल्या पहाटे पैंजण होतेस
चंद्रवेड्या चांदणरात्री
माझ्यापुरतं अंगण होतेस

सोनसळी संध्याकाळी
माझी सांजवात तू
रानांमधून हळूच किलबिल
माझ्यासाठी गात तू

पावसामधून चिंब ओलं
कंच हिरवं रान तू
आयुष्यातल्या गाण्यात माझ्या
सगळ्यांत सुंदर तान तू

स्वप्नात माझ्या तुझ्यासारखीच
तूच खरं! सावली काय
स्वप्नं माझं तुझ्याइतकंच
तुझ्यासारखं सुंदर काय?

डोळ्यांत तुझं पहिलं हसू
आणि श्रावणसर गं
तुझी मिठी निघता निघता
माझं इवलं घर गं

आठवशील तू कधी जेव्हा
हसणं तुझं पुन्हा बघेन
सगळं हरवून तुझ्याजवळ
दोन क्षण पुन्हा जगेन

Wednesday, 18 February 2015

शिवस्तवन

अंतरात सळसळती लखलखती पाती
सांग कधी विझल्या गगनातील ज्योती
ऊर्जस्वल सूर्याची विरली पाउले
स्तब्ध का आज ही रक्ताळली माती
कोणते विष जहाल हिंदराष्ट्र प्याले
गहन दाट घन विराट रौरावत आले
व्यर्थ का उपेक्षिसी स्वये सज्जना रे
उठ करुन समर सज्ज बरच्या अन् भाले
ढासळतील कोसळतील अफझुल्ले सारे
फक्त एक कर विचार शिव गर्जत आले!!!