डोळ्यांत तुझ्या काळीभोर
नभात सजते चंद्रगौर
डोळ्यांत तुझ्या चांदणसय
आणि खळं ओंजळभर
चांदण्यात भिजलेलं
डोळ्यांत तुझ्या ओलं घर
कौलांवरुन ओघळणारी
लावण्याची
दुधाळ सर
डोळ्यांत तुझ्या गर्द राई
डोळे तुझे रानभूल
डोळ्यांत तुझ्या जाई जुई
डोळे कळी डोळे फूल
डोळ्यांत तुझ्या स्वप्नं काही
चंद्राळलेली पाऊलवाट
खळखळणाऱ्या नादिकाठी
डोळ्यांत तुझ्या स्तब्ध घाट
डोळ्यांत तुझ्या काजळभरले
नीळाईचे किती रंग
डोळ्यांत तुझ्या गंधकेशरी
प्राजक्ताचे शारदसंग
डोळ्यांत तुझ्या घट्ट मिठी
डोळे तुझे किती भास
कधीकाळी पाणावलेले
गाभूळलेले हळवे श्वास
तुझे डोळे निळं आभाळ
नक्षत्रांनी गोंदलेलं
डोळ्यांत तुझ्या निःशब्द
पापण्यांनी कोंदलेलं
आठवांच्या अंगणात माझ्या
डोळ्यांमधला लपंडाव
जिथे तिथे अंगणभर
भरुन राहतो तुझा भाव
डोळे तुझे हिरवं गूढ़
पुष्कर आणि माणिकसर
डोळे तुझे गभीर भैरव
डोळे तुझे खिन्न स्वर
मला शोधत शब्दांमध्ये
मी तुझ्या पापण्यांवर
हरवलेली कविता माझी
डोळे तुझे तिचं घर
No comments:
Post a Comment